मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपचे (BJP) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एवढेच नव्हेतर, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही मनसे आणि भाजप यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले. " मनसे जनतेचे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार का? या दीर्घाळापासून चघळल्या जात असलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. “मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेले आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटले आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत युती होऊ शकत नाही. महाराष्ट्रात ज्याप्रकारे परप्रांतीय लोक टॅक्सी, रिक्षा चालवतात, व्यवसाय करतात. तसेच जबलपूर, इंदौर यांसारख्या शहरात लाख मराठी आहेत. यामुळे मनसेची परप्रांतीयांबद्दलची भुमिका आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. यामुळे जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Varsha Raut In ED Office: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल
मागील मुंबई महापालिका निवडणूक 2017 मध्ये विक्रमी 55.28 टक्के मतदानाची नोंद झाली होती. महापालिकेच्या 227 जागांसाठी सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. मुंबईतील एकुण 227 वॉर्डांपैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मुंबईपालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच जोरदार मुसंडी मारली असून गेल्या निवडणुकीत अवघ्या 31 जागा जिंकणाऱ्या भाजपने शिवसेनेला कडवी टक्कर देत 81 जागा जिंकल्या होत्या.