Farmers of Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) केरळनंतर आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. पुढील 2-3 दिवसांत तो मुंबई आणि इतर काही भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मान्सून साधारणपणे 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात पोहोचतो आणि 11 जूनदरम्यान मुंबईत दाखल होतो. मात्र या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे, तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. हवामान खात्याने म्हटले होते की, 16 वर्षांच्या अंतरानंतर केरळमध्ये मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे. शनिवारी, मान्सून एकाच वेळी केरळ, कर्नाटक आणि ईशान्येकडील राज्य मिझोरामच्या काही भागात दाखल झाला.

मुंबईस्थित प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी यांनी शनिवारी सांगितले होते की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे आणि त्याच्या पुढील प्रगतीसाठी हवामान अनुकूल आहे. तो हळूहळू महाराष्ट्राकडे सरकत आहे. कोकण प्रदेशात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे, जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

Maharashtra Weather Update: 

हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे, राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. (हेही वाचा: Monsoon Arrives in Kerala: केरळमध्ये झाले मान्सूनचे आगमन; 2009 नंतरचा सर्वात जलद प्रवेश, पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात पोहोचणार)

या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून, अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.