Rain | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघरर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा (Hailstorms ) पाऊस कोसळत आहे. प्रामुख्याने सांगली (Sangli) शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी अनेक शेतकरी ही द्राक्षे विदेशात पाठवतात तर अनेक शेतकरी (Grapes Growers) त्यापासून मनुके तयार करण्यास प्राधान्य देतात. त्यातून त्यांना उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा प्रकार घडला आहे. ऐन हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. कोल्हापूरमध्येही अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतमालासोबतच इतर पीकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमणावर पाऊस पाहायला मिळतो आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Report: महाराष्ट्रात उष्मा वाढणार, पुढच्या चार दिवसात कोकणासह उर्वरीत महाराष्ट्रातही अवकाळीची शक्यता)

कोकणामध्येही आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत असे हवामान विभागाने आगोदरच म्हटले होते. या चार दिवसांमध्ये राज्यात उष्मा वाढणार (Maharashtra Weather Report) असून काही ठिकणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. प्रामुख्याने कोकणातही (Konkan) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. पाठिमागील दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. या पर्जन्यवृष्टीचा फटका प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला.

दरम्यान, हवामान विभागाने म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे पुढचे काही काळ पावसाची शक्यता अधिक प्रमाणात पाहायला मिळते आहे.