महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आता महिन्याभरापेक्षा कमी दिवसांवर येऊन ठेपली असताना आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. कुडाळ मालवण विधानसभा (Kudal Assembly constituency) मतदारसंघासाठी निलेश राणे आता शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या निलेश राणे यांचा शिवसेनेत (Shiv Sena) पक्ष प्रवेश होणार आहे. आज त्यांनी स्वतः पत्रकात परिषद घेत याची माहिती दिली आहे.
निलेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र आहे. भाजपा कडून जाहीर झालेल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये निलेश यांचे बंधू नितेश राणे यांना भाजपाने कणकवली मधून उमेदवारी जाहीर केली आहे. आता कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने या मतदारसंघासाठी निलेश राणे हातात 'धनुष्यबाण' घेणार आहेत. कुडाळ हायस्कूल मैदानात उद्या निलेश राणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान आपण कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे तर 21 व्या शतकाला शोभेल अशी कामगिरी मतदार संघात करायची असल्याने शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याचं निलेश राणे म्हणाले आहेत.
निलेश राणे 2019 साली भाजपामध्ये आले होते. 2009 साली ते लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मध्यंतरी त्यांनी राजकारणाला वैतागून निवृत्ती जाहीर केली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मतपरिवर्तन केले होते. राणे पिता पुत्रांंचा उद्धव ठाकरेंविरूद्ध जुना वाद आहे. यामधून त्यांनी अनेकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबावर शाब्दिक वार केले आहेत. सध्या कुडाळ मधून उबाठा गटातून वैभव नाईक आमदार आहेत.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर दिवशी मतदार आहे तर 23 नोव्हेंबर दिवशी मतमोजणी आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.