MSBSHSE HSC Board Exam 2020: महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीची परीक्षा (HSC Exam 2020) आज (18 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. अनेकांच्या करियरला टर्निंग पॉईंट ठरणारी ही परीक्षा राज्यभरात 9 विविध जिल्हानिहाय शिक्षण मंडळांकडून एकाच वेळी घेतली जाणार आहे. दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. आजपासून सुरू होणार्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यंदा शिक्षण मंडळाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल केले आहेत. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी शिक्षण मंडळाने 10 समुपदेशक आणि विभागनीय मंडळाकडून एक जिल्हानिहाय समुपदेशक नेमला आहे. Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक.
यंदा18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा होईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी मंडळातर्फे भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती देखील सुरू करण्यात आली आहे.
12वीच्या विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे?
- आजपासून सुरू होणार्या परीक्षांमध्ये सकाळच्या सत्रामधील परीक्षा 11 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेआधी म्हणजे 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंतच परीक्षा वर्गात प्रवेश दिला जाणार असून अकरा वाजल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याच्या कारणाची केंद्रप्रमुख पडताळणी करून प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
- 12 वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून सुरू होणार्या परीक्षेला सामोरं जाताना मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे.परंतू गणित, बुक किपिंग, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विषयांच्या परीक्षेला कॅल्क्युलेटर घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोबाईल किंवा इतर साधनांमधील कॅल्युलेटर वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना नाही.
- विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याशिवाय स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशा अन्य कोणत्याही वस्तू परीक्षा कक्षात नेता येणार नाहीत
ज्युनिअर कॉलेज आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा स्तरावर नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बारावीची अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असेल. या परीक्षेत किमान 25% बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. त्याऐवजी नव्या शैक्षणिक वर्षापासून याचे श्रेणी पद्धतीमध्ये दिले जाणार आहेत.