Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

दहावीच्या परिक्षेच्या तणावातून तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामधील दोन विद्यार्थीनींचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. खामगाव येथील या तिन्ही विद्यार्थिनीनी उंदिर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रुपाली, निकिता आणि नयना अशी या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. या तिघीही नॅशनल शाळेत शिक्षण घेतात. येत्या 1 मार्च पासून दहावी बोर्ड परिक्षा सुरु होणार आहे. परंतु 22 फेब्रुवारी रोजी या तिघींची प्रॅक्टीकल परिक्षा होती. त्यावेळी ही परिक्षा उत्तम न गेल्याच्या निराशेने दुपारी 3 वाजता शाळेच्या समोरच उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यामुळे या तिघींना उलट्या आणि त्रास होण्यास सुरुवात झाली. तर त्यातील नयना हिची प्रकृती अधिकच बिघडल्याने घरातील मंडळींनी तिला अकोल्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर निकिता हिची ही प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला आहे. तसेच रुपाली हिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा-12 वीच्या पेपरतपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार; 30 लाख उत्तरपत्रिका पडून, निकाल लांबण्याची शक्यता ?)

परंतु तपासाआधी तिघींनी पाणीपुरी खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले होते. मात्र उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनीने पोलिसांना सत्य घटना सांगितल्यावर त्यांनी उंदिर मारण्याचे औषध खाल्ले होते हे स्पष्ट केले आहे.