महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा वर्धापन दिन सोहळा रद्द; मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात
MNS (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णवाढीमुळे राज्यात राजकीय, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याच नियमांचे पालन करण्यासाठी 9 मार्च रोजी असणारा मनसेचा (MNS) वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. (मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त काही दिग्गजांच्या मराठी स्वाक्ष-यांचा व्हिडिओ शेअर करुन दिला खास संदेश, Watch Video)

दरवर्षी 9 मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो. राज ठाकरे म्हटल्यावर गर्दी होणारच. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. सोहळा रद्द करण्यात आला असला तरी राज्यभरात मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात होणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन, ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे करता येईल. जागोजागी नोंदणी केंद्र असल्यामुळे गर्दीचा होणार नाही. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन अद्याप झालेले नसल्याचेही नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

मनसेच्या वर्धापन दिनापूर्वी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र शेतकरी आंदोलनामुळे दौऱ्याचं नियोजन अद्याप झालेलं नाही. येत्या काही दिवसांत दौऱ्याची तारीख ठरवण्यात येईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क घालण्याचा कोरोनाचा नियम पाळत नसल्याचे समोर आले होते. स्वत: राज ठाकरे यांनी 'मी मास्क घालतच नाही' असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते. त्यावरुन  उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.