Monsoon | File Photo

जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर 8 जुलै पासून मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज 11 जुलै रोजी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असून अंतर्गत भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघरसाठी हवामान खात्याने येल्लो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काल देखील ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (मान्सून पुन्हा सक्रीय; पुढील 4-5 दिवस राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता)

त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंदुदुर्गमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील घाट विभागांमध्ये चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत मान्सून 9 जून रोजी दाखल झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात हलका पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सक्रीय झालेल्या पावसामुळे सर्वजण सुखावले आहेत. मात्र येथून पुढे मान्सूनचा प्रवास कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.