
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. पुढील 4-5 दिवसांत समाधानकारक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जूनमध्ये राज्यात मान्सूनचे आगमन झाले. सुरुवातीच्या काळात दमदार बरसल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारली होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगर भागांत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला.
मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने तो पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यासोबत पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात 4-5 दिवस मेघगर्जनेसह चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामान खात्याच्या उपसंचालक शुभांगी भुते यांनी दिली आहे. यामुळे बळीराजासह सामान्य नागरिकही सुखावले आहेत. (Monsoon 2021: जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहील- आयएमडी)
जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत मान्सून 9 जून रोजी दाखल झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात हलका पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. परंतु, त्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली. आज सकाळी 8.30 वाचल्यापासून मुंबईमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. दुपारी काही तासाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान, आज रात्री 8 वाजेपर्यंत मुंबईमध्ये सरासरी 26.61 मीमी इतका पाऊस झाला. पूर्व उपगनरांत 26.61 मीमी तर पश्चिम उपनगरांमध्ये 6.96 मीमी इतका पाऊस झाला, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.