Maharashtra MLC Election 2020 Results: भाजपला पुन्हा सुतक, चंद्रकांत पाटील यांची खुमखुमी चांगलीच जिरली- शिवसेना
Uddhav Thackeray and Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधान परिषद निवडणूक 2020 (Maharashtra MLC Election 2020 Results) मध्ये शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाविकासआघाडीने भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अमरसिंह पटेल यांचा अपवाद वगळता भाजपला शून्य जागा मिळाल्या. भाजपच्या या अपयशावरुन शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून भाजपला चांगलाच टोला लगावण्यात आला आहे. विधान परिषद निवडणूक निकालामुळे भाजपला दुसऱ्यांदा सुतक आले. तर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानाचा दाखला देत, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे, असे म्हणत टोलाही लगावला.

दै. सामना संपादकीयात काय म्हटले आहे?

नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱयाने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे. (Maharashtra MLC Election 2020 Results: तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने विजय; एकटे लढण्याची हिंमत नाही, चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडीला टोला)

स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळय़ातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात पन्नास हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा.

भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली.

महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱयांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही. ‘‘विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.