Maharashtra Katal Shilp

कोकणातील अनेक ठिकाणी माळरानावर कोरीव कातळशिल्प (Katal Shilp) आढळून आली आहेत. आदिमानवाने हे विविध आकार दगडात कोरून ठेवलेले आहेत. हे आकार नक्की कशाचे आहेत व त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे, मात्र आता त्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

या कातळशिल्पांना स्पॅनिश शिष्टमंडळानी भेट दिल्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री शेलार म्हणाले की, आपल्याकडील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. या कातळशिल्पांवर विभागाने आंतररष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार करावी. यासाठी या कातळशिल्पांचे फोटोज् तसेच व्हिडिओज् मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावे. या छायाचित्रे आणि व्हिडिओंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले.

कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तर, आदिमानवाने संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावर खोडलेली चित्रे म्हणजे कातळशिल्प. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु कातळशिल्पे ही महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. रत्‍नागिरी, लांजा, राजापूर, देवगड, सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी परिसरातील 110  गावांमध्ये अशी शिल्पे आहेत. या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व 10,000 वर्षे इतका असावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: UNESCO World Heritage Site: आसामच्या Charaideo Maidam चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश; भारतामधील 43 वे स्थळ)

ही चित्रे कोकणातल्या सड्यावर म्हणजेच आडव्या पसरलेल्या जांभ्या दगडाच्या पठारावर कोरलेली आहेत. कोकणातील या कातळशिल्पांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा अंदाज लावता येतो. महत्वाचे म्हणजे या कातळशिल्पांमध्ये खोल समुद्रात आढळणारे प्राणीसुद्धा, जसे की स्टिंग रे, शार्क अगदी त्यांच्या मूळ आकारात आणि अतिशय बारकावे अभ्यासून रेखाटलेले दिसतात. ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाणारी, आणि आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे जगाच्या विविध भागामध्ये आढळून येतात.