महाराष्ट्र अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही; राजेश टोपे
Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र (Maharashtra) अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात (Third Phase) गेलेला नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1135 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 117 कोरोना रुग्णांनी या विषाणुवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र अद्याप तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. मात्र, येत्या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रक्षक हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहेत. तसेच मोठ्या शहरांत मोबाइल क्लिनिक उपलब्ध केले जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. (वाचा - कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; 8 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज सुरू झाल्याची अफवा पसरत आहे. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी ही तिसरी स्टेज नाही. यातील पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तसेच दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण लोकांमध्ये पसरते. मात्र, अद्याप राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.