Uddhav Thackeray. (File Photo: IANS)

Maharashtra Govt Formation: कधी नव्हे ती महाराष्ट्रात निर्माण झालेली प्रदीर्घ काळची सत्ताकोंडी अखेर फुटली आणि राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. संख्याबळाचा विचार करता विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच नावावर मुख्यमंत्री म्हणून तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) (शिवतीर्थ) येथे आज (गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहे. या शपथविधीस राज्य आणि देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याकडे महाराष्ट्र आणि अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असताना शिवसेनेला सत्ता मिळाली होती. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी शिवसेना सत्तेत येत आहे. मनोहर जोशी यांच्या रुपात पहिला तर, नारायण राणे यांच्या रुपात दुसरा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला होता. त्यानंत उद्धव ठाकरे हे तिसरा शिवसैनिक आणि पहिलाच ठाकरे आहेत. जे मुख्यमंत्री पद स्वीकारुन थेट सत्तेत निर्णयप्रक्रियेत येत आहेत. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. (हेही वाचा, Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: उद्धव ठाकरे आज घेणार शिवाजी पार्क वर मुख्यमंत्री पदाची शपथ; देशातील दिग्गज नेते मंडळी लावणार हजेरी)

कोण कोण राहणार उपस्थित?

दरम्यान, अत्यंत उत्सुकता असलेल्या या सोहळ्यास देशभरातून कोणकोणते दिग्गज उपस्थित राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, चर्चा आहे की, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित दिल्याचे समजते. शिवसेना युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. भाजप विरोधी सरकार सत्तेत येत असल्यामुळे युपीए घटक पक्षाचे नेते या सोहळ्यास उपस्थित राहवेत यासाठी शिवसेना प्रयत्नशिल असल्याचे समजते.