Sanjay Raut On Maharashtra Govt: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार येत्या 15 ते 20 दिवसांत कोसळणार; संजय राऊत यांच भाकित
Sanjay Raut | (PC - ANI)

Sanjay Raut On Maharashtra Govt: शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी दावा केला की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे डेथ वॉरंट (Death Warrant) जारी करण्यात आलं आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येत्या 15-20 दिवसांत कोसळेल, असं भाकित संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांचा पक्ष न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

यावेळी संजय राऊत यांनी राज्यसभा सदस्य ठाकरे नेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे यांच्या पक्षाच्या) 16 आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित निकालाचा संदर्भ दिला. विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 आमदारांचे सरकार 15-20 दिवसांत कोसळेल. या सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले आहे. त्यावर कोण सही करणार हे आता ठरवायचे आहे, असा दावा राऊत यांनी केला. यापूर्वीदेखील राऊत यांनी फेब्रुवारीमध्ये शिंदे सरकार कोसळेल, असा दावा केला होता. (हेही वाचा - Uddhav Thackeray in Jalgaon: जळगाव येथे आज धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ,पाचोरा येथे जाहीर सभा; गुलाबराव पाटील समर्थकांकडून उधळण्याचा इशारा)

गेल्या वर्षी जूनमध्ये, शिंदे आणि 39 आमदारांनी सेनेच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केले आणि परिणामी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे यांनी नंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी (भाजप) हातमिळवणी केली.

दरम्यान, 30 जून 2022 रोजी शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील गेल्या वर्षीच्या राजकीय पेचप्रसंगाशी संबंधित उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल राखून ठेवला होता.