भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे बहुमत नाही. त्यामुळे मी राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 नोव्हेंबर 2019) मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पहिल्या दिवसापासून शिवसेनेने नंबर गेम पाहून बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. आम्ही विधानसभा निवडणूक शिवसेनेसोबत युतीद्वारे लढलो होतो. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सरकार बनत नव्हते. शिवसेनेला सोडून महायुतीचे सरकार येणे शक्य नव्हते. अशा स्थितीत राज्यावर किती काळ राष्ट्रपती राजवट कायम राहील याबाबत अनिश्चितता होती. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अजित पवार हे आमच्यासोबत यायाल तयार झाले. त्यामुळे पुरेसे संख्याबळ तयार होणे शक्य होते. मात्र, काही कारणास्तव या आघाडीसोबत आपल्याला कायम राहता येणार नाही, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितले. तसेच, त्यांनीही पदाचा राजीनामा दिला. परिणामी भाजपकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे आता आपण राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिले. भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून 205 जागा दिल्या. आम्ही ही निवडणूक शिवसेना पक्षासोबत युती करुन लढलो. पण, हा जनादेश भाजपला होता असे मी मानतो. कारण, भाजपने लढवलेल्या 70 ते 80 टक्के जागा आम्ही जिंकलो. शिवसेनेने लढवलेल्या 40 ते 42 जागा निवडूण आल्या. त्यामुळे हा जनादेश महायुतीला होता. मात्र, त्याहीपेक्षा भाजपला अधिक होता.
मुख्यमंत्री पदाचं ठरलंच नव्हतं
नंबर गेम पाहून निकालाच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी करत बार्गेनिंग करण्यास सुरुवात केली. मात्र, जे ठरलंच नव्हतं ते द्यायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे जे ठरलं होतं ते द्यायचं जे ठरलं नाही ते द्यायचं नाही अशी भाजपची भूमिका होती. भाजपनं ही तात्विक भूमिका घेतली. असं सांगत मुख्यमंत्री पदाबाबत ठरलंच नव्हतं असा पुननरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही सातत्याने सांगितलं होतं की शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाचं ठरलं नव्हतं. परंतू, शिवसेनेने नंबर गेम पाहून बार्गेनिंग केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
एएनआय ट्विट
Devendra Fadnavis: After this I'll go to Raj Bhavan and tender my resignation. I wish them all the best whoever will form the govt. But that will be a very unstable govt as there is huge difference of opinions. #Maharashtra pic.twitter.com/Wrhb4PE1rV
— ANI (@ANI) November 26, 2019
एएनआय ट्विट
Devendra Fadnavis: The hunger for power is such that now Shiv Sena leaders are even willing to ally with Sonia Gandhi. #Maharashtra pic.twitter.com/8k4IKb9JHU
— ANI (@ANI) November 26, 2019
'मातोश्री'वरुन बाहेरही न पडणारे अनेकंच्या पायऱ्या झिजवू लागले
कधीही मातोश्रीबाहेर न पडणारे शिवसेना नेते सत्तेसाठी अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. भाजपला सत्तेबाहेर ठेवायचा हा चंग बांधूनच शिवसेना पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होती. म्हणूनच निकालानंतर शिवसेनेने पहिल्याच पत्रकार परिषदेत सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत पर्याय पाहायला सुरु केले. सत्तास्थापनेसाठी शिवसेना आमच्यासोबत चर्चा करेन अशी अपेक्षा असतानाच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत चर्चा करु लागली, असे फडणवीस यांन सांगितले.
दरम्यान, गेल्या पाच वर्षात भाजप आणि युती सरकारने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. या सरकारमध्ये शिवसेनासुद्धा आमच्यासोबत होती. या काळात आम्ही जलस्वराज्य, रस्तेबांधणी आणि राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाणारे नवनवे अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. बरीच कामे पूर्ण झाली काही पूर्ण झाली नाहीत. काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या काळात सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, असे स्वत:च्याच सरकारबद्दल कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तसेच, येणाऱ्या नव्या सरकारला शुभेच्छाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.