Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) झाला. या विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदे मोजकी आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची नाराजी दूर करणे हे एकनाथ शिंदे यांच्यासमोरील आव्हान नक्कीच असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतून कळते की, मंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे आणि गटातील काही आमदारांमध्ये खडाजंगीही झाली. यात आमदार संजय शिरसाट यांचे नाव अग्रक्रमावर राहिले आहे. राजकीय वर्तुळात तर ज्या मंत्र्यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही त्यांची जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे कडू यांना एक प्रकारे डच्चू मिळाल्याचे मानले जात आहे. दुसऱ्या बाजूला पाठिमागच्या सरकारमध्ये वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री राहिलेल्या संजय दुलिचंद राठोड यांचाही पत्ता कट झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाची बाजू प्रवक्ते पद नसतानाही जोरदारपणे मांडणार्या संजय शिरसाट यांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शिरसाट तीव्र नाराज असून आमदारांच्या बैठकीत त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची खडाजंगी झाल्याचेही पाहायला मिळ्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश)

याशिवाय नव्याने शिवसेनेत आलेल्या आणि पुढे शिंदे गटात सामिल झालेल्या अनिल बाबर, शहाजी बापू पाटील यांचा तर मंत्रिपदासाठी विचारही केला गेला नाही. अनिल बाबर हे ज्येष्ठ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी मार्गे शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची ही दुसरी टर्म होती. मात्र, तरीही त्यांना मंत्रिपद भेटू शकले नाही. दुसऱ्या बाजूला शहाजी बापू पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र, त्यांनाही पद मिळू शकले नाही. विशेष म्हणजे 'डोंगर, झाडी आणि हाटील' या डायलॉगडमुळे ते जोरदार चर्चेत आले होते. अनिल बाबर, शहाजी बापू पाटील यांच्यासारखे अनेक चेहरे मंत्रिपदाची सूप्त इच्छा मनात बाळगून होते. परंतू, चर्चीत चेहऱ्यांनाच संधी नाही तर सुप्त इच्छा असणारांना कोठून मिळणार? असाच प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मंत्रिपद कायम ठेवण्यात यशस्वी झालेले चेहरे

तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील हे चेहरे आपले मंत्रिपद कायम ठेवण्यात यशस्वी झाले असल्याचे पाहायला मिळते. या सर्वांनी आजच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.