मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास (Maharashtra Cabinet Expansion) अखेर आज (9 ऑगस्ट) मुहूर्त मिळाला. एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेले सर्वजण हे कॅबिनेट मंत्री आहेत. या शपथविधी सोहळ्यात एकाही राज्यमंत्र्याचा समावेश नाही. इच्छुकांची बहुगर्दी आणि मंत्रिपदांची मर्यादित संख्या. यामुळे दोन्ही बाजुंना नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराकडे उत्सुकतेने पाहिले जात होती. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्वांना मंत्रिपदाची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मंत्रिमंडळ यादी (पक्षनिहाय)
एकनाथ शिंदे गट
तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील
भाजप
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील शिंदे- फडणवीस सरकार मध्ये हे 18 जण आज होणार शपथबद्ध; पहा यादी)
ट्विट
Maharashtra Cabinet expansion | 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/1vUX6e2yoy
— ANI (@ANI) August 9, 2022
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधी पक्षाकडून बोलकी प्रतिक्रिया आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, बरे झाले.. अखेर राज्याला मंत्रिमंडळ मिळाले. पण मंत्रिमंडळात समावेश झालेल्या चेहऱ्यांमध्ये काही नावे वगळली असती तर बरे झाले. कोणते चेहरे वगळले असते तर बरे झाले असते? असे विचारले असता आपणांस ते चेहरे माहिती आहे, असे म्हणत अजित पवार यांनी कोणाचाही नामोल्लेख करणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करत म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'. देशाच्या मंत्रिमंडळातही महिलांना स्थान आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मात्र महिलांना संधी मिळू नये हे दुर्दैवी आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेनेही मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी मिळाली नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.