Maharashtra Budget 2020: 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन; 6 मार्चला सादर होणार महाराष्ट्र अर्थसंकल्प
Maharashtra Budget 2020 (Photo Credit - PTI )

Maharashtra Budget 2020: गेल्या आठवड्यात म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. परंतु, आता त्यांची प्रतिक्षा संपली असून येत्या 6 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी 4 आठवड्याचा निश्‍चित करण्यात आला आहे. या अधिवेशनाचे कामकाज 18 दिवस चालणार आहे. 6 मार्चला 2020-21 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील हिंगणघाट जळीतकांड तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचाराची दखल घेण्यात येणार असून नराधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी 5 मार्च रोजी चर्चा केली जाणार आहे. (हेही वाचा - भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार)

विधान भवनात सोमवारी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.