भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार
Sharad Pawar (Photo Credits: IANS)

Delhi Assembly Election Results 2020: भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशावरील आपत्ती आहे. काहीही करुन ती दूर करणे आवश्यक आहे. धार्मिक ध्रुविकरण करुन निवडणुका जिंकता येत नाहीत, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले. दिल्लीतील जनतेने अहंकार निवडणुकीच्या माध्यमातून दूर सारला अशा शब्दांत भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले. बहुमताने विजयी झाल्याबद्दल आणि भाजपला रोखल्याबद्दल आम आदमी पक्ष (AAP) आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे अभिनंदनही शरद पवार यांनी केले. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

केजरीवाल यांनी जनतेच्या मुलभूत समस्या सोडवल्या

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, 'अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडवल्या. जसे की वीज, पाणी, शिक्षण. ज्या नागरिकांना वीजेचे अधिक बील येत असे ते कमी झाले. ज्यामुळे अनेकांना चांगला फायदा झाला. दिल्लीचे राजकारण हे इतर सर्व राज्यांहून वेगळे असते. दिल्लीमध्ये देशभरातील विविध राज्यांतून आलेले लोक राहतात. त्यामुळे दिल्लीतील बदलांचा संदेश देशभर जातो. दिल्लीतील निकाल हा काही दिल्लीपूरता मर्यादीत राहणार नाही. या निकालाचा संदेश देशभर जाईल हे नक्की.

दिल्लीने अहंकार नाकारला

दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर अहंकार पाहायला मिळत होता. भाजपच्या काही लोक मला खाजगीत सांगतात. तेव्हा ते आजूबाजूला पाहतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याबाबत आणि त्यांच्या दहशतीबाबत बोलतात. देशभरामध्ये भाजपचा पराभव होताना दिसत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड अशा राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. दिल्लीतील पराभवाचे लोन देशभर पोहोचेन, असेही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाकडे वाटचाल करण्याची 5 महत्त्वाची कारणं)

भाजपने धार्मीक ध्रुवीकरण केले

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने एक गोष्ट चुकीची केली. तशी चूक ते नेहमीच करतात. या निवडणुकीत भाजपने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न केला. असे असले तरी, धार्मिक ध्रुविकरण करुन निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले. मात्र, भाजपला धार्मिकध्रुविकरण करण्याची संधीच उपलब्ध होऊ द्यायची नाही, ही भाजपविरोधी पक्षांची जबाबदारी असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.

राहुल गांधी यांनी 'तसं' बोलण्याची गरज नव्हती

'युवक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डंडा मारतील' या राहुल गांधी यांच्या विधानाबाबत बोलताना पवार म्हणाले की, राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचारात असे म्हटले नाही. ते बाहेर कुठेतरी बोलताना तसे म्हणाल्याचे मी ऐकले. पण, त्यांनी तसे म्हणायला नको होते. कोणीही अशा पद्धतीची भाषा करु नये असेही पवार या वेळी म्हणाले.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आला. त्यात व्यक्तीश: मला काहीच आश्चर्य वाटत नाही. माझ्या दिल्लीतील निवासस्थानी जेव्हा जेव्हा मी दिल्लीकरांना विचारायचो तर ते सर्वजन केजरीवाल म्हणायचे. दिल्लीयेथील करोनभाग परिसरात मराठी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. त्या परिसरात मी एकदा काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे विचारले असता तेथील नागरिकांनीही अरविंद केजरवाल असेच उत्तर दिले, असे शरद पवार यांनी आवर्जून सांगितले.