Bird Flu Outbreak (Photo Credits: Pixabay)

देशामध्ये हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. महाराष्ट्र राज्यात आज 28 जानेवारी रोजी एकूण 168 पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. राज्यात 8 जानेवारी 2021 पासून ते आजपर्यंत एकूण 19,406 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील खंडाला येथील एक मोर आणि नांदेड जिल्ह्यातील हंगरगा येथील एका घुबडामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास ‘नियंत्रित  क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 71,773 कुक्कुट पक्षी, 44,016 अंडी व 63,234 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई देण्यासाठी 130 लाख रुपये मंजूर केले आहेत. ज्या ठिकाणी कुक्कुट पक्षांव्यतीरिक्त इतर पक्षांमध्ये होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, अशा ठिकाणी देखील सर्वेक्षणाचे काम चालू आहे. या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. (हेही वाचा: Mumbai Metro: स्वदेशी चालकरहित मेट्रोचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण, पाहा फोटोज)

तसेच राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.