MARD Strike: राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक शहरं आणि गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असताना. तसेच, पावसाळ्यात वाढणाऱ्या साथीच्या आजारांची शक्यता असताना राज्यातील तब्बल 4500 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. थकलेले विद्यावेतन मिळावे तसेच, इतरही विविध मागण्या मान्य व्हाव्यात अशी संपकरी डॉक्टरांची मागणी आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सरकारी व महापालिका रुग्णालयांमधील सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. या डॉक्टरांचा संप आजपासून सुरु झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा देण्यासाठीसुद्धा मार्ड ने नकार दिला आहे.
काय आहेत संपकरी डॉक्टरांच्या मागण्या?
- सरकारी (राज्य) रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेवर मिळावे.
- सरकारी (राज्य) रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे गेल्या चार महिन्यांतील थकीत विद्यावेतन मिळावे.
- गेल्या दीड वर्षांपासून मार्डच्या डॉक्टरांनी विद्या वेतनासाठी केलेले आंदोलन विचारात घ्यावे.
- विद्यावेतनात वाढ, वेळेवर विद्यावेतन, टीबी झालेल्या डॉक्टरांना रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा अशा इतर मागण्याही संपकरी डॉक्टर्सनी केल्या आहेत.
थकीत विद्यावेतन पूर्ण मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही
प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील 110 निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. या रुग्णालयातील डॉक्टरांचे विद्यावेतन गेली चार महिने मिळाले नाही. त्यामुळे येथील डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत घोषणा दिल्या. अकोला, अंबाजोगाई, लातूर, नागपूर येथील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना चार महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत थकीत विद्यावेतन पूर्ण मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आम्ही बेमुदत संप पुकारु असे या डॉक्टरांनी प्रशासनाला ठणकावले आहे. (हेही वाचा, निवासी डॉक्टर्स 7ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा; वैद्यकीय सुविधा,आपत्कालीन सुविधा राहणार बंद)
कोल्हापूर आणि पुणे शहरातील डॉक्टर संपात सहभागी नाहीत
दरम्यान, राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला असला तरी, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील डॉक्टर मात्र संपात सहभागी झाले नाहीत. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील डॉक्टर संपात सहभागी झाले नाहीत.