महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून निवासी डॉक्टरांची (Resident Doctors) विद्यावेतनाची (Stipend) प्रलंबित मागणी अजूनही पुर्ण न झाल्याने महाराष्ट्रभरातील निवासी डॉक्टर्स उद्या (7 ऑगस्ट) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यापूर्वीदेखील विद्यावेतनाच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी विविध आंदोलनं केली आहेत. मात्र मागण्यांची अद्याप पुर्तता न झाल्याने डॉक्टरांनी पुन्हा संपावर जाण्याचा इशारा 'मार्ड'ने (Maharashtra Association of Resident Doctors) दिला आहे. संपाच्या काळात वैद्यकीय सुविधांसोबतच,आपत्कालीन सुविधादेखील बंद ठेवली जाणार असल्याने रूग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?
- केंद्र सरकारच्या निवासी डॉक्टर्सप्रमाणे राज्यातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळावे.
- क्षयरोग झालेल्या डॉक्टरांना पुरेशी रजा मिळावी
- महिला डॉक्टरांना प्रसुती रजा मिळावी
मार्डने दिलेल्या इशार्यानुसार निवासी डॉक्टरांच्या सार्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते संपावर जाणार आहेत. विद्यावेतन निवासी डॉक्टरांना वेळच्या वेळी मिळावे यासाठी अकोला, अंबेजोगाई, लातूर, नागपूर या सरकारी वैद्यकीय कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी अनेकदा मागणी केली होती. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.