Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती
Alankruta Bichukale and Abhijit Bichukale (Photo Credits: File Image)

बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग त्यांचं बिग बॉसच्या घरातून अटक होणं असो किंवा मग त्यांचं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणं असो.

अभिजित बिचुकले यांनी 4 ऑक्टोबर रोजी वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाच्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरुद्ध निवडणूक अर्ज दाखल केला. ते अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांनी लिहिलेल्या संपत्तीबद्दलची माहिती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क.

अभिजित बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं नमूद केलं आहे. तसेच फक्त 75 हजार इतकीच रोख रक्कम आपल्याकडे आहे व त्याशिवाय तीन बँकांमध्ये 3 हजार 503 रुपये आहेत असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. म्हणजेच त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती 78 हजार 503 इतकीच असल्याचे दिसून येते.

नक्की वाचा: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अभिजित बिचुकले देणार आदित्य ठाकरे यांना आव्हान; वरळी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून भरणार उमेदवारी अर्ज

परंतु त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांची संपत्ती मात्र अभिजित यांच्यापेक्षा 3 पटीहून अधिक असल्याचे अलंकृत यांच्या निवडणूक अर्जावरून सिद्ध होतं. अलंकृत यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात लिहिल्यावर त्यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम आहे. त्यासोबतच बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी वाहन, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण 3 लाख 26 हजार 818 रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे.

याचाच अर्थ अभिजित बिचुकले यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.