लाऊडस्पीकर । PC: Twitter/ANI

महाराष्ट्रामध्ये सध्या 'लाऊडस्पीकर' वरून वाद पेटला आहे. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू असा आदेश दिल्यानंतर सध्या राजकीय, प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरेंचा दावा आहे की हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने रमजान ईद अर्थात 3 मे पर्यंत त्यांनी राज्य सरकारला भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिलं आहे. पण काही मौलवींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना मशिदींवरील भोंगे उतरवणार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने आता काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थाची स्थिती तणावग्रस्त होत असल्याचं चित्र आहे. सध्या राज्य सरकार कडून गृहमंत्र्यांनी येत्या 1-2 दिवसांत लाऊडस्पीकरच्या वापरावरून नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती दिली आहे. पण सध्या मुंबईत कोणत्या ठिकाणी किती डेसिबलच्या आवाजात लाऊडस्पीकरला परवानगी आहे हे देखील जाणून घ्या.

भारत हा विविध संस्कृतींचा, जाती-धर्मांनी सजलेला देश आहे. त्यामुळे वर्षभर सतत प्रत्येक धर्म, जाती,पंथानुसार वेगवेगळे सण साजरे होत असतात. भारतीय सण आणि जल्लोष हे समीकरणच असल्याने अनेकदा लाऊडस्पीकर सर्रास वापरले जातात. मग जाणून मुंबई पोलिस कायद्याप्रमाणे कोणत्या भागात किती डिसिबल आवाजात लाऊडस्पीकर वाजवायला परवानगी देतात. हे देखील नक्की वाचा: Loudspeaker Row in Maharashtra: केवळ परवानगी असलेले लाऊडस्पीकर प्रार्थनास्थळांवर वाजणार; नाशिक मध्ये पोलिस आयुक्तांकडून परिपत्रक जारी करत सूचना जारी.

मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, सध्या मुंबई मध्ये इंडस्ट्रीअल झोन, कमर्शिअल झोन रेसिडेंशिअल झोन आणि सायलंस झोन अशा चार विभागात वर्गवारी करून तेथे सकाळी आणि रात्री दोन सत्रात लाऊडस्पीकर लावण्यसाठी वेगवेगळ्या डेसिबलमध्ये परवानगी दिली जाते.

Noise pollution (regulation and control) Rules – 2000 च्या नियमावलीनुसार सध्या

इंडस्ट्रिअल भागात सकाळच्या सत्रात 75dB (A) आणि रात्रीच्या सत्रात 70dB (A) परवानगी देते.

कमर्शिअल झोन मध्ये सकाळच्या सत्रात 65dB (A) आणि रात्रीच्या सत्रात 55dB (A) परवानगी देते.

रेसिडेंशिअल झोन मध्ये सकाळच्या सत्रात 55dB (A) आणि रात्रीच्या सत्रात 45dB (A) परवानगी देते.

सायलंस झोन मध्ये सकाळच्या सत्रात 50dB (A) आणि रात्रीच्या सत्रात 40dB (A) परवानगी देते.

दरम्यान मुंबई मध्ये सकाळचं सत्र हे पहाटे 6 ते रात्री 10 या वेळेतील आहे. आणि रात्रीचं सत्र रात्री 10 ते पहाटे 6 या वेळेतील ग्राह्य धरलं जाते. कायद्यास अनुसरून जारी केलेल्या आदेशाचा, नियमांचा भंग केल्यास त्यासाठी ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु. १,००,०००/- ( रुपये एक लाख ) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

आजच गृहमंत्र्यालयाने दिलेल्या आदेशानुसार केवळ परवानगी असलेले लाऊडस्पीकरच वाजवले जाऊ शकतात. अनधिकृत लाऊडस्पीकरवरून काहीही वाजवल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. तुम्हांला मुंबईमध्ये लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास मुंबई पोलिसांकडून त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन देखील होऊ शकते. लाऊडस्पीकर साठी परवाना सशुल्क दिला जातो. त्याच्या अर्जासाठी 10 रूपये  आकारले जातात. 7 दिवसांसाठी लाऊडस्पीकर लावण्याकरिता 200 रूपये मोजावे लागतात. त्यानंतर 7 दिवसांपेक्षा जास्त आणि 30 दिवसांपेक्षा कमी कलावधीसाठी लाऊडस्पीकर वापरायचा असल्यास प्रति दिन 20 रूपये अधिक मोजावे लागतात.