PM Modi in Wardha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा म्हणजे प्रचंड गर्दी, लोकांनी तुंडूंब भरलेलं मैदान आणि कार्यकर्त्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह हे जणू समिकरणच. परंतू, लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) प्रचारार्थ वर्धा (Wardha) येथे सोमवारी (1 एप्रिल) झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत हे समिकरण फारसे जुळून आले नाही. नेहमीच्या तुलनेत वर्धा येथील सभेला लोकांची फारशी गर्दी झाली नाही. मोदींच्या सभेसाठी निवडण्यात आलेलं मैदान गर्दी अभावी रिकामे रिकामे भासत होते. थेटच सांगायचे तर, मोदींच्या भाषणावेळी जवळपास अर्ध मैदान हे पूर्णपणे रिकामंच होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन आपल्या नेहमीच्या शैलीत आज सकाळी मराठीमध्ये ट्विट करुन आजच्या सभेबाबत माहिती दिली होती. मोदींच्या ट्विटला त्यांच्या फॉलोअर्स आणि नेटीझन्सकडून मिळालेला प्रतिसाद पाहता आजच्या सभेलाही तुडूंब गर्दी होणार असा अनेकांचा कयास होता. प्रत्यक्षात मात्र सभास्थळी मोदींच्या भाषणावेळी अर्ध मैदान रिकामंच असल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवातही वर्धा येथूनच केली होती. त्यावेळी हे मैदान लोकांच्या गर्दीने ओसंडून गेले होते. प्राप्त माहितीनुसार, हे मैदाना 18 एकर इतक्या भव्य जागेवर विस्तारलं आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे लोकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. मात्र, पंतप्रधानांची पुढची सभा मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. हे मैदान सुमारे 27 एकर जागेवर विस्तारले आहे. आजच्या गर्दीची तुलना करायची तर हे मैदान अर्धेदेखील भरणार नाही, असे अनेक लोक सांगतात. त्यामुळे मोदी यांच्या महाराष्ट्रातील पुढच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. (हेही वाचा, PM in Wardha: शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील पकड कमी झाली, अजित पवार यांचे वर्चस्व वाढतंय: नरेंद्र मोदी)
#VIDEO: मोदींच्या वर्ध्यामधील सभेला अर्ध मैदान रिकामंhttps://t.co/ckNTkhfCt7 < येथे वाचा सविस्तर वृत्त#ModiInWardha #wardha #BJP #Maharashtra pic.twitter.com/2avhQyZRwE
— LoksattaLive (@LoksattaLive) April 1, 2019
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2019 चे रणशिंग मेरठ येथील सभेतून फुंकले. त्यावेळीही मोदींच्या सभास्थळी पाठिमागच्या बाजूच्या खुर्च्या रिकाम्याच असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे निवडणुकीचे वारे वेगळ्या दिशेने वाहात असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.