राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेना पक्षाच्या मंचावर उपस्थिती, राजकीय चर्चांना उधाण
राधाकृष्ण विखे-पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुरुवारी (25 एप्रिल) आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. याबद्दल अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता विखे पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आज काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा संगमनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. परंतु विखे पाटील यांनी संगमनेर (Sangamner) येथील सभेला उपस्थिती न लावत चक्क शिवसेनेच्या (Shiv Sena) मंचावर आपली उपस्थिती लावली. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसनामा  यांनी दिलेल्या वृत्तानुसार, विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बोलले जात होते. मात्र त्यांनी शिवसेनेच्या मंचावर उपस्थिती लावल्याने आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे ह्याने सुद्धा काही दिवसांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश केल्याने ते सुद्धा याच पक्षात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.(अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती)

विखे पाटील उद्या पत्रकार परिषद घेणार असून त्यावेळी ते आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. तसेच नितीन गडकरी यांचीसुद्धा सभा होणार असल्याने या सभेमध्ये विखे पाटील भाजप पक्षात प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.