विधानपरिषद निवडणूक 2020 (Maharashtra MLC Election 2020) मध्ये नुकत्याच मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्ष (Congress Party) पुन्हा एकदा जोमात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस (Maharashtra Congress) जोमाने कामला लागली असून, जय्यत तयारीही करत आहे. शिक्षक आणि पदविधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकासआघाडीस मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही (Local Body Elections 2021) यश खेचून आणण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे सन 2020 मध्ये स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रम आता जाहीर होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी 2021 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरु शकते. या वर्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा अशा अनेक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा, BMC Election 2022: मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; भाई जगताप यांचे मोठे वक्तव्य)
राज्यात 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर नजर टाकता या वर्षात नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर या पाच मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिका निवडणुकी होत आहेत. तर दोन जिल्हा परिषदा, 13 नगर परिषदा व 83 नगर पंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 13 सदस्यांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केलेली आहे. तसेच या सर्व निवडणुकांसाठी पक्ष निरीक्षकांच्या नेमणुकाही करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसच्या 12 मंत्र्यांकडेही संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी आहे. आतापासूनच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याचे मार्गदर्शनही केले जात आहे.
दरम्यान, राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असले तरी काँग्रेसने कंबर कसली असून काँग्रेसचे सर्व नेते मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. काँग्रेसला आणखी उभारी देण्यासाठी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधत सर्व तयारी सुरु केलेली आहे. राज्यात सत्ता आहेच, त्यात तीन पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे फारसे अवघड नाही हा आत्मविश्वासही कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.