BMC Election 2022: मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; भाई जगताप यांचे मोठे वक्तव्य
Bhai Jagtap (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली होती. नुकतीच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली होती. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूकदेखील (BMC Election 2022) महाविकास आघाडी एकत्रच लढवणार, असा दावा केला जात होता. मात्र, मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी काँग्रेस (Congress) मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

टीव्ही9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार. तसेच माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. या काळात नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार असून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे, असे भाई जगताप म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस नेते नसीम खान यांनीदेखील मुंबई महापालिकेचा सर्व 227 जागांवर आम्ही निवडणूक लढणार असल्याचे म्हंटले आहे. यामुळे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मैदानात उतरणार की स्वबळावर लढणार? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. हे देखील वाचा- Mumbai Metro Car Shed Project: आरे शिवाय दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा, वेळ वाया जाणार म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य्मंत्र्यांना केली 'ही' विनंती!

अशोक जगताप यांना भाई जगताप या नावाने ओळखले जाते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्य केले असून नुकतीच त्यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा, प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान आणि समन्व. समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमजरजित सिंह मनहास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.