Landslide Risk: रायगड जिल्ह्यातील 103 गावांना भूस्खलनाचा धोका; सरकारकडून अजूनही काहीच हालचाल नाही
Raigad Landslides | (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणू महामारीचे सावट असताना महाराष्ट्राला पुराचा (Maharashtra Flood) मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांना भूस्खलनाचा (Landslide Risk) धोका आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, जिल्ह्यात पूर आला असताना महाड शहरातील पाण्याची पातळी काही ठिकाणी 25 फुटांनी वाढली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, एक मजली इमारती व अनेक इमारतींचे तळ मजले पाण्याखाली गेले आहेत. असेही सांगितले जात आहे की, यापूर्वी आलेल्या पुरामध्ये पाण्याची पातळी 12 फुटांपलीकडे कधीच पोहोचली नव्हती.

गेल्या आठवड्यात 24 तास चालू असलेल्या अविरत पावसामुळे सातारा जिल्ह्यातील हिल स्टेशन महाबळेश्वर येथे 530 मिमी, महाड येथे 383 मिमी आणि पोलादपूर शहरात 575 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे किनारपट्टीच्या कोकण भागात असलेल्या रायगडमध्ये पूर आला होता. महाड येथील नागरिक आणि व्यावसायिकांनी मुंबई-गोवा रोडवरील नव्या पुलालाही पुरासाठी जबाबदार धरले आहे.

ते म्हणाले की, या पुलामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग सापडला नाही. रायगड जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांच्या कार्यालयातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 103 गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात तळीये गावात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 95 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2005 मध्ये, भूस्खलनग्रस्त गावांतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडे एक योजना सादर करण्यात आली होती, परंतु हा प्रकल्प कधीच सुरू झाला नाही. (हेही वाचा: महाराष्ट्रात पुरामुळे तब्बल 4000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज, 209 जणांचा मृत्यू; NCP करणार 16,000 कुटुंबांना मदत)

2005 मध्येच भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या अहवालात रायगड जिल्ह्यातील 100 हून अधिक ठिकाणांना भूस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यावर सरकारने काही केले नाही.