लक्ष्मी विलास बँकेचे (Lakshmi Vilas Bank) प्रशासक टीएन मनोहरन (TN Mnoharan) यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून ठेवीदारांच्या पैशांची परतफेड करण्यासाठी बँकेकडे रक्कम उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. तसंच बँकेचे विलीनीकरण देखील वेळेत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आरबीआय नियुक्त प्रशासकांनी दिलेल्या माहितीमुळे बँकेच्या हजारो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या बँकेला पुनरुज्जीवीत करण्याचा कोणताही प्लॅन लक्ष्मी विलास बँकेच्या संचालक मंडळाकडे नसल्याने रिझर्व बँकेने संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. त्यानंतर टीएन मनोहरन यांना आरबीआयने प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य असल्याचे नियुक्तीनंतर टीएन मनोहरन यांनी सांगितले. टीएन मनोहरन हे कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष असून त्यांची 30 दिवसांसाठी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (Laxmi Vilas बँकेवर RBI ची कारवाई, खातेधारकांना आता महिन्यातून केवळ 25 हजार रुपये काढता येणार)
टीएन मनोहरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी विलास बॅंकेकडे 20,000 कोटींची ठेव आहे. बँकेने 17,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. आर्थिक संकटात असलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने 17 नोव्हेंबर रोजी मोरेटोरियम लागू केला होता. हे निर्बंध 16 डिसेंबर 2020 पर्यंत कायम राहणार आहेत. या कालावधीत ग्राहक बँकेतून 25000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. (93 वर्ष जुन्या असलेल्या लक्ष्मी विलास बँकला आर्थिक अनियमिततचे कारण देत RBI कडून निर्बंध)
लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. डीबीएस इंडियामध्ये विलीनीकरण होणार असून लक्ष्मी विलास बँकेमध्ये 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. याअंतर्गत डीबीएस लक्ष्मी विलास बँकेच्या 560 शाखांचा ताबा घेईल. यात LVBच्या गृह, वैयक्तिक आणि स्मॉल स्केट इंडस्ट्री कर्जाचा समावेश असेल.