लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) म्हणजे राज्यातील सामान्य नागरिक, महिला आणि प्रसारमाध्यमांसाठीही चर्चेचा केंद्रबिंदू. दररोज नवी चर्चा, अफवा आणि बरंच काही. त्यामुळे संभ्रम इतका वाढला आहे की, सामान्य नारिकांना योजनेत काय बदलले आहे आणि काय नाही, याचा मेळच लागत नाही. या योजनेचा हप्ता 2100 होणार अशी चर्चा असतानाच सरकारने जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर हळूच जमा केले. दरम्यान, आता या योजनेचे निकष बदलणार (Ladki Bahin Yojana Criteria) अशी चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना विचारले असता त्यांनी याबाबत महत्त्वाचे भाष्य केले.
निकष बदलणार की नाही?
रायगड येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास महिला व बालविसासमंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजना निकष बदल झाला आहे का? नागरिकांमध्ये तशी चर्चा आहे, असे विचारले. यावर उत्तरादाखल बोलताना त्या म्हणाल्या, 'राज्यात सुरु असलेली ही योजना कायम राहणार आहे. तसेच, त्याच्या निकषामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाहीत. आगामी काळातही त्यामध्ये कोणता बदल होणार नाही.' (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना', सरकारविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप)
पुढे बोलताना तटकरे म्हणाल्या, ही योजना राज्यात प्रचंड यशस्वी ठरली आहे. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा बदलही होतो आहे. अनेक महिलांना योजनेबाबत जागृती आली आहे. त्यामुळे सदन अलेल्या आणि निकषात न बसलेल्या महिला स्वत:हून पुढाकार घेत पुढे येत आहेत आणि आपणास या योजनेचा लाभ नको असे सांगत आहेत. पण, समाज आणि महिलांमध्ये या योजनेस मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली असल्याने ते या योजनेबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही महिला व बालकल्याणमंत्र्यांनी या वेळी केला. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले की नाही? )
दरम्यान, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा आणि नव्या वर्षातील पहिला हप्ता (जानेवारी 2025) लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे. सातवा हप्ता 26 जानेवारीपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असे सरकारने म्हटले होते. त्यानुसार शब्द पाळत सरकारने हे पैसे खात्यावर जमा केल आहेत. त्यासाठी राज्याच्या अर्थ विभागाने महिला व बालविकास खात्याकडे काही दिवसांपूर्वीच तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांचा चेक देऊन ठेवला होता. स्वत: अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाब प्रसारमाध्यमांकडे माहिती दिली होती.