Sanjay Raut staggering journey: दैनिक सामना (Saamana) या वृत्तपत्राचे संपादक, शिवसेनेचा बुलंद आवाज, कडवा शिवसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचा संज्या, 'मातोश्री'चे दिल्लीतील 'कान, नाक, डोळे' अशा एक ना अनेक भूमिकांमध्ये शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्याला सहज दिसतात. विधानसभा निवडणूक 2019 नंतर शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यातील सत्तासंघर्षात भाजप नेतृत्वावर त्यांनी केलेली शाब्दिक तलवारबाजीचा तर उभा महाराष्ट्र पाहतो आहे. आज संजय राऊत हे राजकीय नेते, पत्रकार म्हणून राज्याच्या राजकारणात आणि देशात प्रसिद्धिच्या शिखरावर असले तरी, त्यांचा हा प्रवास एका रात्रीतील सुपरस्टारप्रमाणे मुळीच नाही. गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि मानापमान अशा अनेक पैलूंची त्याला किनार आहे. अशा या संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार ते नेता (Journalists To Political Leader) असा संजय राऊत यांचा थक्क करणारा प्रवास लेटेस्टली मराठी (latestly Marathi) वाचकांसाठी.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील एका गावात 15 नोव्हेंबर 1961 या दिवशी संजय राऊत यांचा जन्म झाला. आवश्यक शिक्षण घेतल्यावर संजय राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकासाठी लिहायला लागले. त्यांच्या लेखणीची सुरुवात साप्ताहिक लोकप्रभातूनच झाली. त्या काळात सर्व मराठी दैनिकांतून गुन्हे वृत्त (क्राईम न्यूज) यायच्या पण केवळ बातम्या म्हणून. विशेष अशी क्राईम स्टोरी कोणी कव्हर करत नसे. संजय राऊत यांनी ती सुरुवात केली. साप्ताहिक लोकप्रभामध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत. त्या काळात संजय राऊत यांनी लिहिलेल्या क्राईम स्टोरी प्रचंड गाजल्या. जुन्या, जाणत्या लोकांमध्ये त्या आजही स्मरणात आहेत. त्या काळात शिवसेना राजकारणात हातपाय मारत होती. व्यंगचित्रकार असल्याने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांचे समाजातील विविध घटना, घडामोडींवर बारीक लक्ष असायचे. खास करुन महाराष्ट्रात लिहिल्या, छापल्या जाणाऱ्या गोष्टींवर. साप्ताहिक लोकप्रभातून छापून येणाऱ्या लेखांमधून संजय राऊत हे शिवसेनेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचे बाळासाहेबांना वाटत असे. तेव्हाच संजय राऊत हे बाळासाहेबांच्या नजरेत बसले होते. 1989 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना नावाचे दैनिक सुरु केले. त्या वेळी अशोक पडबिद्री हे सामनाचे कार्यकारी संपादक होते. 1993 मध्ये ही जागा संजय राऊत यांनी घेतली आणि ते सामना दैनिकाचे कार्यकरी संपादक झाले.
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी यांच्या 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकाचा संदर्भ घेता संजय राऊत हे सुरुवातीला 'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकात मार्केटींग विभागात काम करत असत. पुढे ते साप्ताहिक लोकप्रभा मध्ये रुज झाले. सूत्रांकडून अचूक माहिती काढणं. ती महिती बातमीत योग्य शैलित आणि शब्दांत मांडणं हे संजय राऊत यांचे खास वैशिष्ट्य होते. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास काही मोजक्याच पत्रकारांना जमला आहे. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात राऊत यांच्या प्रवासाबद्धल अनेकांना उत्सुकता असते.
संजय राऊत हे गेली अनेक वर्षे सामना दैनिकाचे संपादक राहिले आहेत. देशाच्याच नव्हे तर जगाच्याही कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी, सामनातील अग्रलेख संजय राऊतच लिहितात. प्रामुख्याने महाराष्ट्र, मग देश आणि अपवादात्मक स्थितीत आंतरराष्ट्रीय विषयांवर सकाळी अग्रलेख लिहायचा आणि तो सामना कार्यालयात पाठवायचा असा राऊत यांचा शिरस्ता. सामना संपादकीयातील शब्द, शैली हे सगळे कसे सूत्रात बांधल्यासारखेच असते. बाळासाहेबांच्या भाषणातील फटकारे, ओरखडे, शालजोडी, शिवराळपणा, शब्दांची पकड याचे येथेच्छ दर्शन सामना संपादकियात दिसते. (हेही वाचा, नवे सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?)
सामनातील अग्रलेख हे नेहमीच चर्चात्मक आणि वादग्रस्त ठरले आहेत. सामनातील लिखाणाची स्टाईल ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीशी मिळतीजुळती राहिली आहे. त्यामुळे अनेकांना हा लेख बाळासाहेबांनीच लिहिला असावा, असे वाटत असे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही सामना संपादकियातील शैली कायम आहे. एकेकाळी क्राईम स्टोरी लिहिणारे संजय राऊत सामना दैनिकात रुजू झाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शैली त्यांनी लिखाणासाठी धारण केली. विविध विषयांवर ते बाळासाहेबांशी चर्चा करत, त्यांची भूमिका समजून घेत आणि मगच ती भूमिका अग्रलेखात उतरवत. बाळासाहेब ठाकरे अखेरच्या काळात आणि त्यांच्या निधनानंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी आणि सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आली. त्यामुळे आता विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन सामना संपादकियाची रेशा ठरते. सामनातील भूमिका आणि शिवसेना नेतृत्वाची भूमिका यात फारसे अंतर कधी पडले नाही. परंतू, तरीही बाळासाहेब असताना किंवा त्यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि सामना यांच्यातील भूमिका यात अपवादाचे काही प्रसंग आले. ज्या प्रसंगात शिवसेना आणि सामना संपादकीय यांतील भूमिकांमध्ये परस्परविरोध दिसला. पण, तो हाताच्या बोटांवर मोजण्यासारखा.
दरम्यान, एका पत्राच्या मुखपत्राचे संपादक म्हणून दै. सामनामधील भाषा शिवसेनेच्या भूमिकांसाठी अनुकुल असली तरी, वृत्तपत्राची भाषा म्हणून ती प्रवाहाच्या बाहेरचीच ठरते. त्यामुळेच अनेकदा सामनातील भाषा ही भडकाऊ आणि विखारी असल्याचा आरोप सामनातील लिखाण आणि भाषेवर होत असतो. शिवसेना विरोधात त्या काळात भूमिका घेतलेले शरद पवार, छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे राजकीय विरोधक असोत की 'महानगर' सारखं एखादं दैनिक. यांविरोधात सामनातून नेहमीच अश्लाघ्य आणि शिवराळ भाषेचा खुलेआम आणि येथेच्छ वापर झाल्याचे पाहायला मिळते. खास करुन मुंबईमध्ये घडलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीवेळीही सामनातून आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषा वापरल्याचे अनेक विश्लेषकांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे सामना संपादक असले तरी ते शिवसेनेचे राज्यसभा खासदारही आहेत. त्यामुळे त्यांचे लिखाण एका कडव्या शिवसैनिकाचे दर्शन घडवणारे असले, शिवसेना नेतृत्वाच्या भूमिकेशी अनुकुल असले तरी, त्यांच्यावर अनेकदा 'पगारी नेता' अशी टीकाही होते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर दै. सामनातून तीव्र शब्दांत टीका केली गेली. या टीकेला उत्तर देताना राणे यांनी राऊत हे पगारी नेता असून त्यांच्या टीकेला आपण गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले होते.
विविध मुद्दे आणि लिखाणाची शैली आदिंच्या आधारे संजय राऊत हे दै. सामना हे नेहमी चर्चेत कसे राहील याची पुरेपूर काळजी संजय राऊत घेतात. म्हणूनच एरवी मराठी प्रसारमाध्यमांची, मराठी माध्यमांची फारशी दखल न घेणारी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय (हिंदी, इंग्रजी) प्रसारमाध्यमं दै. सामनाची विशेष दखल घेतात. दै. सामनामुळे शिवसेना आपोआपच चर्चेच्या केंद्रस्थानी येते. अनेकदा हिंदी आणि हिंदी न येणारे दक्षणेकडील वाचकही सामना भाषांतरीत करुन किंवा कोणाकडून तरी समजावून घेऊन वाचतात, असे अनेक राजकीय अभ्यासक विशेष उल्लेखाने सांगतात.
त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि आता उद्धव ठाकरे यांच्या संजर राऊत यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती प्रचंड गाजल्या आहेत. ही प्रसिद्धी शिवसेना आणि सामना यांच्या लोकप्रियतेसाठी परस्परपुरक ठरताना दिसते.
सर्वपक्षीय संबंध
संजय राऊत यांची संपादक म्हणून भूमिका एका बाजूला आणि त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध दुसऱ्या बाजूला असतात. बेभरवशाच्या असलेल्या राजकीय क्षेत्रात असे संबंध ठेवणे म्हणजे अनेकदा अविश्वासाचे वातावरण निर्माण करणेच ठरते. पण, राऊत यात निष्ठावंत ठरले. सर्वपक्षीयांशी असलेले संबंध सौहार्दाचे असले तरी राऊत यांच्या पक्षनिष्ठेवर आजवर कुणीच संशय घेऊ शकले नाहीत. ते निसंशय शिवसैनिक राहिले आहेत. कदाचित म्हणूनच अगदी अडचणीच्या काळातही शिवसेनेच्या अंगावर आलेल्या भल्याभल्यांना शिंगावर घेण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर टाकत असावेत. पत्राकर ते नेता असा प्रवेस केलेल्या या नेत्यास दीर्घायू लाभो या सदिच्छा.