JNU Violence Opposed By Mumbai Students (Photo Credits: ANI)

दिल्ली (Delhi) येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)  सुमारे 40 ते 50 जणांच्या घोळक्याने विद्यार्थी संघटना अध्यक्ष आइशी घोष (Aishe Ghosh) यांच्यासहित शिक्षक व विद्यार्थ्यांवर काल रात्री जबर हल्ला चढवला होता. यामध्ये जवळपास 30 विद्यार्थी 12 शिक्षक व स्वतः घोष गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय घोळक्याने वसतिगृहांची देखील तोडफोड केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेने या हल्ल्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांवर आरोप लगावला आहे. या एकूण प्रकरणाचे पडसाद मुंबई (Mumbai), पुणे (Pune) सहित महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी शांतात आंदोलन स्वरूपात कँडल मार्च (Candle March) काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केले.

प्राप्त माहितीनुसार, आज सुद्धा मुंबईत संध्याकाळी चार वाजता हुतात्मा चौकात या हल्ल्याचा संशय असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. 'जॉइंट ऍक्टशन कमिटी फॉर सोशल जस्टिस'च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. तर पुणे येथे संध्याकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होईल.

ANI ट्विट

दरम्यान या एकूण प्रकरणाचा दोष जरी एबीव्हीपी वर लावला जात असला तरी स्वतः एबीव्हीपीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, हा हल्ला लेफ्टिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थी वर्गाने केल्याचे म्हणत यामध्ये स्वतः एबीव्हीपीचे 25 कार्यकर्ते घायाळ झाले आहेत आणि 11 जण अजूनही बेपत्ता आहेत असेही सांगण्यात आले आहे.

जेएनयू मध्ये मागील 70 दिवसांपासून वसतिगृह शुल्कवाढीवरून सुरु असणाऱ्या वादातूनच हा हल्ला झाला असल्याचे म्हंटले जात असले तरीही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तूर्तास या शुल्कवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून सेमिस्टर परीक्षेच्या नोंदणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे ज्यामुळे वाद आणखीन चिघळला गेला असे म्हंटले जातेय.