JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी
Violence in JNU (Photo Credits: ANI)

Violence In JNU: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोष यांना विद्यापीठाच्या आवारात जमावाने मारहाण केली. या हल्ल्यात घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. वृत्तानुसार, सुमारे 50 लोकांचा घोळका विद्यापीठाच्या परिसरात घुसला आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घोळक्याने वसतिगृहांची तोडफोड देखील केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेने या हल्ल्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे.

घोष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मास्क घातलेल्या लोकांनी तिच्यावर पाशवी हल्ला केला होता. ती पुढे म्हणाली, “मी आत्ता बोलण्याच्या स्थितीत नाही. मला निर्घृणपणे मारहाण केली आहे.”

आयएनएस या वृत्तसंस्थेनुसार जेएनयूच्या पेरियार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी लेफ्ट विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि गंभीर जखमी केले. एबीव्हीपीच्या जेएनयू युनिटचे अध्यक्ष दुर्वेश यांनी आयएनएसला सांगितले की, “पेरियार वसतिगृहात सुमारे चारशे ते पाचशे लेफ्ट सदस्य एकत्र आले आणि त्यांनी तोडफोड केली आणि जबरदस्तीने घुसखोरी केली आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आत मारहाण केली.

एबीव्हीपीने दावा केला आहे की अध्यक्षपदाचे उमेदवार मनीष जांगिड हे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांचा हात गमावला आहे. दुर्गेश पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली होती, ज्यामुळे काही जणांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

दरम्यान, वसतिगृह शुल्काच्या शुल्कवाढीमुळे आणि येत्या सेमिस्टर परीक्षेसाठी नोंदणीवर बहिष्कार टाकल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. हा हल्ला शुल्कवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी सर्व्हर रूमची तोडफोड केल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केल्याच्या एका दिवसानंतर झाला आहे. वसतिगृहाच्या शुल्कवाढीबाबत 70 दिवसांपासून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा निषेध होत आहे.