Devendra Fadnavis, Jayant Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

संधी मिळताच भाजपला (BJP) टपली मारण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्य तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी केली. 'मी पुन्हा येईन' असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी '2024 मध्ये राज्यात भाजपची एकहाती सत्ता आणणार' असा निर्धार नागपूर येथे व्यक्त केला. हाच धाका पकडून जयंत पाटील यांनी टोला लगावला.

जयंत पाटील यांनी म्हटले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये राज्यात भाजपची एकहाती सत्ता आणणार, असा निर्धार व्यक्त करताना पहिल्यांदा मान्य केले की, 2024 पर्यंत ते सत्तेत येत नाहीत. म्हणजे त्यांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली. याचाच अर्थ महाविकासआघाडी सरकारला 2024 पर्यंत धोका नाही. त्यांनी सत्य सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांना धन्यावदही देतो', असे म्हणत जयंत पाटील यांनी त्यांच्या खास अशा संयत शैलीत भाजपला चिमटा काढला. (हेही वाचा, Jayant Patil On Nawab Malik: नवाब मलिक यांच्या अटकेमुळे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठी जबाबदारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वपूर्ण निर्णय)

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आलेले जयंत पाटील काहीसे अधिक गंभीर दिसत होते. मात्र, नवाब मलिक यांच्यानंतर विषय देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केलेल्या निर्धाराकडे वळला आणि जयंत पाटील यांनी खास शैलीत टोलेबाजी करत वातावरणातील ताण काहीसा हलका केला. स्मीतहास्य करत जयंत पाटील यांनी लगावलेले टोले ऐकून उपस्थित पत्रकारांमध्येही हास्याची लकेर उमटली.