Jayant Patil On Nawab Malik: नवाब मलिक यांच्या अटकेमुळे धनंजय मुंडे, प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठी जबाबदारी; शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वपूर्ण निर्णय
Nawab Malik | (Photo Credit - Twitter)

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने पक्षांतर्गत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडे असलेल्या परभणी आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी इतर दोन मंत्र्यांवर सोपविण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्याकडे परभणी आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, मलिक यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. ते ज्या पदावर आहेत त्याच पदावर राहतील असेही जयंत पाटील म्हणाले.

नवाब मलिक हे आजही त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे मंत्री आहेत. तसेच, पक्षामध्ये त्याच्याकडे असेलली जबाबदारीही कायम आहे. परंतू, ते सध्या उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांना आहे त्याच पदावर ठेऊन प्रभारी पद इतरांकडे देण्यात येत आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. मलिक हे सध्या उपलब्द नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे काम थांबू नये यासाठी हा निर्णय  घेण्यात आल्याचेही पाटील म्हमाले.  दरम्यान, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांनी डांबून ठेवले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. नवाब मलिक यांच्याकडे असलेले मंत्रीपद कायम राहणार की त्यांचा राजीनामा घेणार? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ. निर्णय झाला की आपल्याला कळवू, अशी सावध भूमिका जयंत पाटील यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, BMC Election 2022: नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये नव्या चेहऱ्याच्या शोधात)

दरम्यान, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेतही काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे होती. मात्र, मलिक यांच्या अटकेमुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामही काहीसे मंदावले होते. त्यामुळे या कामाला चालना देण्यासाठी आता दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेत्या राखी जाधव तसेच, नरेंद्र राणे यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी पक्षाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.