Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मुंबईमध्ये नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील राष्ट्रवादी (NCP Mumbai ) काँग्रेसची जबाबदारी होती. नगरसेवक ते आमदार आणि पुढे मंत्री अशी कामगिरी केलेल्या नवाब मलिक यांना मुंबई महापालिका आणि निवडणुका यांचा चांगला अनुभव आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election 2022) तोंडावर असताना मलिक यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 (PMLA ) अन्वये अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांना पर्यायी चेहरा देण्याच्या विचारात असल्याचे समजते. पक्षातील काही मंडळींचा असाही विचार आहे की, नवाब मलिक यांच्या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून नव्या व्यक्तीची निवड करण्यापेक्षा कोणावर तरी प्रभारी म्हणून कार्यभार सोपवावा. नवाब मलिक यांच्या गैरहजेरीत मुंबई महापालिका निवडणुकांना सामोरे जाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक आव्हानच असणार आहे. दरम्यान, मुंबई शहराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निर्णय घेणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Sharad Pawar On BJP: नवाब मलिकची अटक राजकीय हेतूने, दाऊद इब्राहिम मुस्लिम असल्याने त्याचा संबंध जोडला जात आहे - शरद पवार)

नवाब मलिक यांच्या अनुपस्थितीत नरेंद्र राणे यांचे नाव चर्चेत आहे. राणे हे यापूर्वी सिंद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे प्रमुख होते. दुसऱ्या बाजूला एनसीपी मुंबईचे सरचिटणीस मिलिंद यवतकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, 'सध्या आमचे सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. लवकरच आम्ही मुंबई महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. आम्हाला भाजपविरोधात लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी अध्यक्षाची आवश्यकता आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेस या आधी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढली होती. तेव्हा राष्ट्रवादीने 122 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 9 जागा जिंकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले होते. दरम्यान, राष्ट्रवादीने यापूर्वी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दुसऱ्या बाजूला शिवसेनेसोबत आघाडी करण्याचाही राष्ट्रवादीचा विचार असल्याचे समजते.