Jalgaon Suicide: लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेलं कोविड-19 (Covid-19) संकट एकटं आलं नाही. सोबत अनेक समस्या, प्रश्न, विवंचना घेऊन आलं. यातून अनेकजण नैराश्यात गेले आणि त्यांनी मृत्यूला कवटाळलं. आत्महत्येचं हे सत्र अद्याप संपलेलं नाही. अशीच एक घटना जळगाव (Jalgaon) येथून समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने एका 35 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केली आहे. संजय चिरमानी असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्या मागे बायको आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. (Pune Suicide: बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास लावून आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना)

संजय यांचं फुले मार्केटमध्ये रेडिमेड कपडे विक्रीचा एका छोटासा गाडा होता. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. यातच व्यवसाय सुरु करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी सावकरांनी तगादा लावला. या सगळ्यात कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे हा प्रश्न होताच. एकाच वेळी चहुबाजूंनी भेडसवणाऱ्या या समस्यांमुळे संजय यांचा धीर खचला. ते नैराश्यात गेले आणि त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (मुंबई मध्ये चांदिवली परिसरात शेजार्‍यांच्या जाचाला कंटाळून 44 वर्षीय महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या; एकाला अटक)

आत्महत्येपूर्वी त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केलं. मुलांना शीतपेय आणून दिलं आणि रुममध्ये निघून गेले. त्यावेळेस संजय यांची पत्नी शेजारील महिलांशी गप्पा मारत होती. रात्री अकराच्या सुमारास आत्महत्येची घटना उघडकीस आली. त्यानंतर पत्नीनं शेजारच्यांच्या मदतीने संजय यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.