PPE कीट घालणे वेदनादायी तर कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे कठीण; कोविड 19 रुग्णांची सेवा करुन महिन्याभरानंतर परतलेल्या नर्सने सांगितला अनुभव
Nurse Radhika Vinchurkar Who Works at COVID-19 Hospital in Nagpur (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसची वाढणारी व्याप्ती यामुळे आरोग्य सेवकांवरील ताण वाढत आहे. यासाठी देशभरातील अनेक आरोग्य सेवक जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. नागपूर मधील अशीच एक कर्तव्यदक्ष नर्स तब्बल महिनाभरानंतर रुग्णसेवा करुन घरी दाखल झाली आहे. त्यांनी आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. राधिका विंचूरकर (Radhika Vinchurkar) असे या नर्सचे नाव असून त्या नागपूर (Nagpur) येथील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (Indira Gandhi Government Medical College & Hospital) मध्ये कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती कोविड 19 वॉर्डमध्ये करण्यात आली होती. तब्बल महिन्याभरच्या सेवेनंतर घरी परत आल्यावर शेजारच्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

राधिका यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, "कोविड 19 रुग्णांवर उपचार करणे अगदी कठीण असून PPE कीट घालणे वेदनादायक आहे. तसंच अनेक कोरोना बाधित रुग्णांना त्यांना विनाकारण हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, असे वाटते. त्यामुळे ते अनेकदा वैतागतात. तर कधी अनावश्यक गोष्टींची मागणी करतात."

ANI Tweet:

सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 15525 इतकी झाली असून त्यापैकी 2819 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. तर 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 12089 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. तसंच मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.