Nawab Malik (Photo Credits: ANI)

ITI Online Admission:चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माहिती दिली आहे. ही मुदत शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी संपणार होती. मात्र, त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, 2015 ते 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यास अडथळा येत आहे. एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले, तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Muharram 2020: महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्या 'मोहरम' बाबत मार्गदर्शक सूचना; यंदा मातम मिरवणूकीला परवानगी नाही)

आयटीआय प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. राज्यातील 417 शासकीय व 569 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 84 व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण 6 हजार 868 तुकड्यांमधून एकूण 1 लाख 45 हजार 632 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपद्वारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. प्रवेश अर्ज मोबाईलद्वारेदेखील भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी, असं आवाहनदेखील नवाब मलिक यांनी केलं आहे.