मुंबईमध्ये डोंगरी परिसरात इमारत कोसळल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने केलेल्या तपासणीसत 499 इमारती अतिधोकादायक (Highly Dangerous Buildings) ठरल्या आहेत. यापैकी 16 इमारती महापालिकेने पाडल्या आहेत मात्र अजूनही 485 धोकादायक इमारतीमध्ये लोक आपला जीव टांगणीला लावून रहात आहेत. तर तब्बल 14,858 इमारती धोकादायक ठरल्या आहे. महत्वाचे म्हणजे पालिकेच्या अतिधोकादायक यादीमध्ये डोंगरी परिसरातील ही इमारत नाही, त्यामुळे आता या यादीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या अतिधोकादायक इमारती पैकी आतापर्यंत 68 इमारती खाली करण्यात आल्या आहेत, तर 65 इमारतींचे वीज व पाणी खंडित केले आहे. मात्र अजूनही 485 इमारती तशाच आहेत. या सर्व इमारती मुख्यत्वे मुंबई परिसरात मोक्याच्या जागी आहेत, तसेच या इमारती पुन्हा बांधून कधी तयार होतील याचा काहीच कालावधी नाही. त्यामुळे नागरिक त्या खाली करण्यास तयार नाही. मात्र या इमारतींचे लवकर पुनर्वसन झाले नाही तर डोंगरी इमारत सारख्या घटनेमध्ये नक्कीच वाढ होईल. (हेही वाचा: केसरबाई इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 14; श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू)
पावसाळ्यात इमारत कोसळण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अशा इमारतींवर मे महिन्यात सर्व विभाग अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत सुमारे म्हणजे सुमारे पाच ते सवापाच हजार जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. इमारतीला धोकादायक असा दर्जा मिळूनही मालक इमारतीचा पुनर्विकास तयार करण्यासाठी तयार होत नसेल तर, अशा इमारतीचा म्हाडाच्या माध्यमातून विकास केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.