Honest Auto Rickshaw Driver: तब्बल 11 तोळे सोने, 20 हजार रुपयांची रोख रक्कम केली परत, पुणे येथील रिक्षाचालक विठ्ठल मापारे यांचा प्रामाणिकपणा
Auto Rickshaw | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown), प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर, ठप्प झालेले व्यवसाय, अनकांच्या गेलेल्या नोकऱ्या यांमुळे सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या संसारांना प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशाच अडचणीत असतानाही पुणे (Pune) येथील एक रिक्षाचालक प्रचंड प्रामाणिक (Honest Auto Rickshaw Driver) निघाला. या रिक्षा चालकाने रिक्षात राहिलेले का प्रवाशाचे तब्बल 11 तोळे सोने आणि 20 हजार रुपयांची रोख रक्कम परत केली आहे. ही घटना बुधवारी (9 सप्टेंबर) दुपारी दिड वाजणेच्या सुमारास घडली. रिक्षा चालकाचा हा प्रामाणिकपणा पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विठ्ठल मापारे (Driver Vitthal Mapare) असे या प्रामाणक रिक्षाचालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील मुंडवा परिसरातील केशवनगर येथे खुदुस मेहबुब शेख व त्यांची पत्ती शहनाज शेख यांनी विठ्ठल मापारे यांच्या रिक्षातून प्रवास केला. शेख दाम्पत्याला त्यांच्या इच्छित ठिकाण गाडीतळ बसस्टॉप येथे सोडून विठ्ठल मापारे हे परत आपल्या रिक्षा स्टँडला आले. त्यांनी बी.टी.कवडे रोड पामग्रोव्हज रिक्षा स्टॅन्ड येथे आपली रिक्षा रांगेत लावली आणि ते चाहा प्यायला गेले. चहा पिऊन मापारे परत आले तर त्यांना रिक्षाच्या मागच्या सीटमागे एक पिशवी दिसली. ही पिशवी आपल्या आगोदरच्या ग्राहकाचीच असावी असा संशय आल्याने मापारे आपल्या रिक्षासह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. (हेही वाचा, सातारा: खिशात केवळ 3 रूपये असताना 54 वर्षीय व्यक्तीने प्रामाणिकपणा दाखवत परत केले 40,000 रूपये; उदयनराजे भोसलेंपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र होतंय कौतुक)

दरम्यान, आपला ऐवज रिक्षातच राहिल्याचे शेख दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने घोरपडीगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. शेख दाम्पत्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हडपसर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. तसेच, बॅगचे वर्णन सांगितले. संबंधित वर्णनाची बॅग जर कोणाला सापडली अथवा कोणी वचारपूस केली, माहिती दिली तर त्याबाबत घोरपडीगाव पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असा संदेश ठेवला.

दरम्यान, विठ्ठल मापारे हे रिक्षासह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी बॅग पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांनी सर्व माहिती घेऊन बॅगची पुष्टी केली आणि घोरपडीगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. शेख कुटुंबीयांना त्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज परत मिळाला. तर, रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून पलिसांनी विठ्ठल मापारे यांचा हार घालून सत्कार केला.