सातारा: खिशात केवळ 3 रूपये असताना 54 वर्षीय व्यक्तीने प्रामाणिकपणा दाखवत परत केले 40,000 रूपये; उदयनराजे भोसलेंपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र होतंय कौतुक
Indian Money (File Photo)

पैशांचा मोह माणसाची नियत क्षणांमध्ये फिरवू शकतो पण सातार्‍यातील 54 वर्षीय माणसाने मात्र पैशांसमोर आपला प्रामाणिकपणा मोठा असतो याचा दाखला देत अजूनही माणूसकी जीवंत असल्याचं दाखवून दिलं आहे. सध्या सातार्‍याच्या धनाजी जगदाळे (Dhanaji Jagdale) या व्यक्तीच्या प्रामाणिकतेचं सर्वत्र कौतुक होतं आहे. धनाजी यांनी 40,000 रूपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करताना त्याच्या बदल्यात केवळ 3 रूपये घेतले.

धनाजी हे आपल्या गावी दहीवाडीला दिवाळी आणि काही कामानिमित्त गेले. परतीच्या प्रवासादरम्यान बस स्टॉपवर त्यांना 40,000 रूपयांचं नोटांचं पुडकं सापडलं. काही वेळ त्यांनी जवळपास चौकशी केली. त्यावेळेस एक माणूस चिंतेत दिसला. त्यावेळेस हे पैसे त्यांचे असवेत असा अंदाज आल्यानंतर त्यांनी पैसे परत केले. त्यांनी हे पैसे पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जमवले होते. त्यावेळेस धनाजी यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून 1000 रूपये देऊ केले. मात्र धनाजींनी हे नाकारत केवळ 7 रूपये घेतले. कारण त्यांच्या प्रवासाच्या 10 रूपयांच्या तिकीटासाठी केवळ 7 रूपये कमी पडत होते.

धनाजी जगदाळे यांचा सातार्‍यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, उद्यनराजे भोसले यांनी गौरव केला आहे. मात्र त्यावेळेसही धनाजी जगदाळे यांनी पैशांचे बक्षीस स्विकारले टाळले. त्यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करण्यासाठी अमेरिकेतूनही 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले होते तेही धनाजींनी विनम्रपणे नाकरले. धनाजींच्या मते, पैसे तुम्हांला समाधान देत नाही. माझ्यामुळे समाजात प्रामाणिकतेच्या शिकवणीचा प्रसार होत असेल तर ते चांगले आहे. तोच माझा हेतू आहे.