CM Devendra Fadnavis

महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणात मोठा बदल घडत आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षा धोरण (NEP) 2020 आणि राज्य पाठ्यक्रम आराखडा (SCF) 2024 नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याची घोषणा केली. हा बदल 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेपासून सुरू होईल आणि 2028-29 पर्यंत सर्व इयत्तांपर्यंत विस्तारित होईल. या नव्या त्रिभाषिक धोरणामुळे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकणे बंधनकारक होईल, ज्यामुळे विद्यमान द्विभाषिक (मराठी आणि इंग्रजी) प्रणाली बदलणार आहे.

हिंदीला अनिवार्य करण्याच्या निर्णयाने महाराष्ट्रात तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे अशा अनेकांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. आता महाराष्ट्राच्या शाळांमध्ये हिंदीचा समावेश तिसऱ्या भाषेत करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘मराठीऐवजी हिंदी सक्तीची केलेली नाही; मराठी बंधनकारक आहे. मात्र, नवीन शिक्षण धोरण (एनईपी) तीन भाषा शिकण्याची संधी देते आणि तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘धोरणानुसार, या तीन भाषांपैकी दोन भारतीय भाषा असाव्यात. हिंदी लादली जात आहे असे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात मराठी सक्तीची राहील, मराठी भाषा बंधनकार राहील.’ यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेबाबत टोला लगावला. ते म्हणाले, ‘मला अनेकदा आश्चर्य वाटते की आपण हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करत असताना, इंग्रजीची प्रशंसा करतो आणि आपल्या खांद्यावर घेतो. मला उत्सुकता वाटते की, भारतीय भाषा आपल्यापासून दूर का वाटतात तर इंग्रजी जवळची वाटते. ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपण विचार करायला हवा.’ (हेही वाचा: Hindi Third Language In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू)

Hindi in Maharashtra Schools:

राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020, हे विद्यार्थ्यांना बहुभाषिक बनवण्याचा आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्रात मराठी भाषेला विशेष स्थान आहे, आणि हे नवे धोरण मराठीच्या अनिवार्यतेला बाधा आणत नाही. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय हा शैक्षणिक सुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र हिंदीच्या अनिवार्यतेमुळे मराठी अस्मितेला धक्का लागण्याची भीती आणि शैक्षणिक संसाधनांच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला वाद यामुळे सरकारला सावध पावले उचलावी लागतील.