व्यावसायिक प्रशिक्षण आणि सेवांमध्ये राज्य पुढारलेले असून, उद्योगासाठी पायाभूत सुविधांसह पोषक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना शासन सहकार्य करेल. विश्वभरातून आलेले उद्योजक हे देशाची संपत्ती असून, शासन आणि उद्योजकांनी सहकार्याने काम केल्यास राज्यासह देश अधिक बलवान बनेल असे मत मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. विश्व मराठी संमेलन 2023 अंतर्गत भारतातील व भारताबाहेरील उद्योजकांचा सहभाग असलेली उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री केसरकर बोलत होते. मंत्री केसरकर म्हणाले, कौशल्याधारित मनुष्यबळ राज्यात उपलब्ध आहे. शंभर टक्के भांडवली गुंतवणूक परतावा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. नवउद्योग, लघु उद्योग, आणि उद्योगात नविनता आणण्यासाठीचे जाळे ग्रामीण भागात कार्यरत आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी राज्यातील सर्वात मोठे सुविधा देणारे इंडस्ट्रियल पार्क आहे, नव उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
पाणी, वीज, पायाभूत सुविधा, रस्ते, जलवाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे वाहतूक आदी सुविधा राज्यात उपलब्ध असून, नव उद्योजकांचे राज्यात स्वागत असल्याचे मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. विश्वभरातून आलेले उद्योजक आणि राज्य शासन यांनी समन्वयाने कार्य केल्यास औद्योगिक विकास साध्य करता येईल. तसेच मराठी भाषाही जगभर पोहोचविण्याचे काम आपण करू शकू अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय विदेशसेवा अधिकारी डॉ. सुजय चव्हाण म्हणाले, कौशल्याधारित लघु उद्योगांमुळे अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होते. (हेही वाचा: 'राजवस्त्र बाजूला ठेवा आणि या, मग पाहतो', संजय राऊत यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान)
राज्यातील उद्योग प्रकल्प आणि पर्यटनाचा आपल्या स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना केले. उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह यांनी राज्याची सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक प्रगती, राज्यातील विकासाची सूची, अग्रगण्य उद्योन्मुख आणि विकासात्मक सेक्टर, विकासात्मक सुविधा, गुंतवणूकीसाठी नेमेलली नोडल एजन्सी, उद्योग विकासासाठी केंद्रीत करण्यात आलेले क्षेत्र यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. रंगा नाईक आणि पी. मल्लिकनेर, उद्योग विभागाचे सह सचिव संजय देगावकर यांच्यासह विविध देशातून आलेले उद्योजक उपस्थित होते.