उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना थेट आव्हान (Sanjay Raut challenge to Narayan Rane) दिले आहे. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 'मला जेलमध्ये घालण्याची भाषा काय करता, न्यायालय, कायदा तुमच्या हातात आहे का? होय, मी माझ्या पक्षासाठी लढवय्येपणे केंद्रीय तपास यंत्रणांना सामोरे गेलो. तुमच्यासारखे ईडी, सीबीआयला घाबरुन पळालो नाही', असा टोलाही राऊत यांनी राणे यांना लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी आज सकाळी ते बोलत होते.
संजय राऊत यांनी नारायण राणे यांना थेट आव्हान देत म्हटले की, 'नारायण राणे यांच्यावर मी अजून काहीच बोललो नाही. ते आमचे एकेकाळचे सहकारी होते. त्यामुळे झाकली मुठ सव्वालाखाची. पण मी जर त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बोललो ना. तर ते 50 वर्षे जेलमध्ये जातील. जेलमध्ये घालायच्या धमक्या मला कसल्या देता? जर धमक्या द्यायच्याच असतील ना, तर राजवस्त्रं बाजूला करुन मैदानात या. मग पाहतो. माझा नाद करु नका' असे स्पष्ट आव्हानच राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले. (हेही वाचा, Nitesh Rane On Ajit Pawar: आमदार नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार, ट्विट करत साधला निशाणा)
नारायण राणे यांनी काय म्हटले होते?
कोकणातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. दैनिक सामना मध्ये 26 डिसेंबर रोजी लिहीलेल्या एका अग्रलेखाचा दाखला देत राणे यांनी म्हटले होते की, 'संजय राऊत याला पुन्हा जेलचा (Jail) रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार. 26 डिसेंबरला लिहिलेल्या अग्रलेखाचे कात्रण आहे माझ्याकडे.'
दरम्यान, नाशिक येथील उद्धव ठाकरे समर्थकांचा (50) शिंदे गटात प्रवेश झाला. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, हे जे काही लोक गेले आहेत. ते नाशिकच्या लोकांनाही माहिती नाहीत. काही दोनपाच दलाल गेले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. नाशिकची शिवसेना भक्कम आहे. ती भक्कम राहिल. काही लोकांना नादाला लावायचे आणि मेंढरांचे कळप घेऊन जायचे म्हणजे काही पक्षांतर होत नाही, असेहीते म्हणाले.