Dr Shyamrao Wakode | (Photo Credit: X / ANI)

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College In Nanded) एकाच वेळी झालेल्या 24 मृत्यूंमुळे राज्यभरात खळबळ उडाली. प्रशासन आणि पर्यायाने राज्य सरकारवर टीकेची झोड उडाली. दरम्यान, या प्रकाराबद्दल आता खुद्द वैद्यकीय महाविद्यालयानेच खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. महाविद्यालयाचे डीन डॉ. शामराव वाकोडे यांनी सांगितले की, महाविद्यालयात ज्या मुलांचा मृत्यू झाला ती सर्व मुले कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होती. यामध्ये लहान मुलांसह इतरही वयोगटातील रुग्णांसा समावश आहे. ज्यामधील अनेक जण हे मधुमेह, यकृत किंवा किडणी निकामी होणे अशा आजाराने ग्रस्त होते. त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या होत्या. महाविद्यालयात कोणत्याही प्रकारे डॉक्टरांची किंवा औषधांची कमतरता नव्हती. मात्र, रुग्णांनी उपचारांनाच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांचाया मृत्यू झाला.

डॉ. शामराव वाकोडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पाठिमागील 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पण, वास्तविक पाहता त्यातील 12 मुलांचा मृत्यू एक-दोन दिवसांपूर्वीच झाला आहे. याशिवाय मृतांमध्ये जवळपास 70 ते 80 वयोगटातील रुग्णांची संख्या 8 इतकी होती. या सर्वच जण हे गंभीर शारीरीक आजार आणि समस्या यांच्याशी झुंजत होते. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना रुग्णांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या मृत्यू झाला. (हेही वाचा, Nanded Hospital Deaths: नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत तब्बल 24 रुग्ण दगावले; मृतांमध्ये 12 बाळांचा समावेश)

ट्विट

दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि अपुर्‍या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मृताच्या एका कुटुंबीयांनी सांगितले की, “माझ्या नवजात मुलावर चांगले उपचार केले गेले नाहीत. येथे डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार आहे. दुसऱ्या बाजूला डॉ. वाकोडे यांनी 'द हिंदू'शी बोलताना सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात औषध खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकाईन संस्थेने सर्व सरकारी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा बंद केला आहे. ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणीतही भर पडली आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर औषधे व्यवस्थापित करण्याचा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न केला.परंतु ते पुरेसे नव्हते. साधारण 60-70 किमीच्या परिघात हे एकमेव मोठे रुग्णालय असल्याने, आमच्यावर खूप मोठा ताण आहे आणि आमचे मंजूर बजेट स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यासाठी पुरेसे नाही.