Gopinath Munde Political Journey: गोपीनाथ मुंडे, भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते. ज्यांची आजही जनमानसातील ओळख 'एक संघर्षयात्री' अशीच आहे. अकाली आणि अपघाती मृत्यू ओढवलेल्या गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती (Gopinath Munde Birth Anniversary). 12 डिसेंबर 1949 रोजी परळी येथे जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तीगत आणि राजकीय आयुष्यही अत्यंत खडतर स्थितीत गेले. त्यांना संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळाले नाही. पांडुरंगराव मुंडे आणि लिंबाबाई मुंडे यांच्या पोटी जन्माला आलेले गोपीनाथराव यांच्या शालेय शिक्षणाचा प्रवास हा गावातील प्राथमिक शाळेत झाडाच्या सावलीत सुरू झाला. पण चिकाटीच्या जोरावर हा माणूस आयएलएस कॉलेजमध्ये वकीलीचे धडे गिरवू लागला पण विद्यार्थीदशेत असतानाच सामाजिक आणि राजकीय चळवळीकडे खेचला गेला. ज्यातून पुढे महाराष्ट्राला एक तडफदार नेता मिळाला. ते पुढे केंद्रात मंत्रीही झाले. मात्र, अकाली मृत्यूमुळे त्यांना केंद्रात आपले काम फारसे दाखवता आले नाही. अशा या नेत्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनाविषयी.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:
गोपीनाथ मुंडे यांचा शैक्षणिक प्रवास त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत झाडाच्या सावलीत सुरू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण सुरु होऊनही त्यांनी शिक्षण पुढे कायम ठेवण्यावर भर दिला. पुढे त्यांनी आयएलएस कॉलेजमध्ये दोन वर्षांचा एलएलबी प्रोग्राम सुरू केला. दरम्यान, ते राजकीय आणि सामाजिक चळवळींकडे ओढले गेले. (हेही वाचा, Gopinath Munde Jayanti 2019: 'संघर्षयात्री' गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन आणि राजकीय प्रवास)
राजकीय दीक्षा:
भाजप नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासमवेत मुंडे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्यासोबतच ते राजकीय संघटनेत काम करु लागले. त्यांच्या समर्पण आणि नेतृत्व कौशल्यामुळे त्यांनी 1980 ते 1985 आणि 1990 ते 2009 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जवळपास पाच वेळा काम केले.
लोकसभेचा कार्यकाळ:
लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवत गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. 2014 मध्ये भाजपचे सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले असताना आणि केंद्रीय कृषीमंत्री म्हणून शपथ गेतली. मात्र, पुढच्या काहीच काळात दिल्ली येथे त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
वारसा आणि विचार:
गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले असले तरी महाराष्ट्रातील जनमानसात आणि खेड्यापाड्यांसह वाड्यावस्त्यांवर आजही त्यांचे समर्थक, चाहते आपल्याला पाहायला मिळतात. आज रोजी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिणी खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही कन्या गोपीनाथरावांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे चालवत आहेत. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग मुंडे भगीनिंना पाठिंबा देताना दिसतो.