Pune: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाचे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; 1 ऑक्टोबरला होणार निर्णय
Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान, पुणेकरांनाही (Pune) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरु आहे. याबाबत येत्या 1 ऑक्टोबर रोजी सर्व आमदार, खासदार, अधिकारी मिळून एक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी चिंचवड येथील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, कोरोनाच्या कोणत्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येईल? याबाबत सगळे आमदार, खासदार आणि अधिकारी मिळून 1 ऑक्टोबर रोजी चर्चा केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. याचवेळी अजित पवार यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, राज्यात ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु असल्या तरी, त्याला खूप मर्यादा होत्या. अखेर शाळेतील वातावरण आणि मुलांनी एकत्र बसण्याचा अनुभव महत्वाचा आहे. यासाठीच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Rain Forecast: पुढील 5 दिवस पावसाचे; मध्य महाराष्ट्रासह कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा

पुणे जिल्ह्यात लसीचा एक कोटीचा टप्प्या पार झाला आहे. जिल्ह्यातील 83 टक्क्यांहून अधिक लोकांना पहिला तर, 44 टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचे आहे. हे अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.