Ganpati (Photo Credits: Instagram)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने यंदाच्या वर्षातील सर्व धर्मातील सण अत्यंत साधेपणाने साजरे करावे असे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात मोठ्या स्तरावर साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने गणेश मंडळांनी गणेशाची मुर्ती 4 फुटापर्यंत असावी असे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव 2020 साठी सविस्तर मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणपतीची मुर्ती 4 फुट आणि घरगुती गणेशाची मुर्ती 2 फुटापर्यंत असावी. यंदाच्या वर्षी नागरिकांनी शक्यतो पारंपरिक गणेशमुर्ती ऐवजी धातू/संगमरवर सारख्या मुर्तींचे पूजन करावे. शाडूची मुर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घराची घरी करावे. घरी शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी करावे.(Ganeshotsav 2020: चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळ यंदा चांदीच्या गणेशमूर्ती ची करणार प्रतिष्ठापना, See Post)

मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरांचे आयोजन करावे. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी गर्दी होणार नाही आणि ध्वनी प्रदुषणासंदर्भात नियमांचे पालन करावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट किंवा फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावी.

गणपतीच्या मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. तसेच गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टंन्सिंगसह मास्क, सॅनिटायझर बाळगण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर महत्वाची बाब म्हणजे गणेशोत्साच्या वेळी करण्यात येणाऱ्या गणेशाच्या आरतीच्या वेळी मंडपात एकाचवेळी फक्त 10 कार्यकर्त्यांना आरतीसाठी उपस्थितीत राहण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.(Lalbaugcha Raja Aarogya Utsav लालबागचा राजा मंडळाच्या गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव उपक्रमाचं नेटकर्‍यांनी केलं स्वागत; पहा गणेशभक्तांच्या ट्वीटर रिअ‍ॅक्शन्स!)

गणेश मुर्तीच्या आगमन आणि विसर्जनावेळी मंडळाचे 10 पेक्षा अधिक जण नसतील किंवा कोणतीही मिरवणूक काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उत्सवाप्रसंगी कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव होणार नाही याची खरबदारी घ्यावी. याचे उल्लंघन केल्यास साथीरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 आणि 1860 कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.